Monday, July 7, 2008

Wednesday, February 27, 2008

Tuesday, February 26, 2008

मे महिना सरत आलेला असतो , आसमंतातला उकाडा आता शिगेला पोचलेला असतो आणि त्याची चर्चा सुरु होते . तो कुठवर आलाय ? अजुन किती दिवस लागतील ? वर्तमानपत्रात त्याच्या बातम्यांकडे डोळा लागलेला असतो . तसा कुठे कुठे तो आपली वर्दी देत असतोच . आणि एक दिवस “दक्षिण दिग्विजय” करुन जेत्याच्या थाटात तो दाखल होतो . उन्हाचे पहारे हा हा म्हणता उठतात आणि अनभिषिक्त राजाच्या दिमाखात त्याअची सद्दी सुरु होते .
मी मान्सून बद्दल बोलतोय हे एव्हाना लक्षात आलं असेलच . उन्हाच्या काहिलीने मन सुनं सुनं झाल्यावर येतो तो मान्सून . अर्थात पाऊस . निसर्गचक्राचा सृजनशील आविष्कार . सुर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ़ होते . हलकी असल्याने ती वर वर जाते . या वाफ़ेचे ढग बनतात . हे ढग डोंगरांमुळे अडतात आणि थंडाव्यामुळे वाफ़ेचं पुन्हा पाण्यात रुपांतर होतं . हाच पाऊस असं आपण शाळेत घोकंपट्टी करत शिकलेलं असतं . पण या ऋतुचक्राला गदिमांसारखा सिद्धहस्त कवी आपल्या प्रतिभेने एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो …

नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर
कशी शहाण्यांची मनं , नाही नदीला माहेर !
काय सांगू बाप्पांनो, तुम्ह आंधळ्याचे चेले
नदी माहेरा जाते म्हणून तर जग चाले .
नदीचे सारे पाणि पोटी घेतो हा सागर
पण तिला खुणावतो जन्म दिलेला डोंगर
डोंगराच्या मायेसाठी रूप वाफ़ेचे घेऊन
नदी उडत जाते पंख वार्‍याचे लेवून
पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा
पान्हा फ़ुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा…!


अगदी पहिल्या सरीपासूनच हा पाऊस आपल्याला प्रेमात पाडतो . पहिल्या पावसानंतर येणार मृद्गंध… जणू प्रसवाला सज्ज झालेल्या धरित्रीचा हुंकार…! टपोर्‍या थेंबांना पाहून कुणा युवतीच्या पायातील पैंजणांची आठवण व्हावी …
दोन्ही आवाजात तेच माधुर्य आणि तेच अंगावर सुखद शिरशिरी आणणं …!

पण शहरवासीयांसाठी पाऊस महत्त्वाचा असतो फ़क्त धरणातल्या पाणीसाठ्यासाठी किंवा एखाद्या वर्षा सहलीपुरता . तसा वागला की मग तो अगदी आज्ञाधारक ठरतो . पण त्याने जरासा खट्याळपणा सुरु केला की मग तारांबळ उडवून देतो . मग हीच मंडळी पावसाच्या नावाने बोटं मोडायला सुरुवात करतात . अशाच दोन विचारातला वाद कवी सौमित्र यांनी भांडणार्‍या प्रेमी युगुलाच्या निमित्तानं छानच टिपलाय…

पाऊस म्हणजे चिखल सारा , पाऊस म्हणजे मरगळ..
पाऊस म्हणजे गार वारा , पाऊस म्हणजे हिरवळ..

पाऊस कपडे खराब करतो , पाऊस वैतागवाडी..
पाऊस म्हणजे भिजरी पायवाट , पाऊस म्हणजे झाडी..

पाऊस रेंगाळलेली कामं , पाऊस म्हणजे सुट्टी उगाच..
पावसामध्ये गुपचुप निसटून मन जाऊन बसतं ढगात …
प्रेमी युगुलांसाठी पाऊस म्हणजे पर्वणीच . एकाच छत्रीतून एकमेकांना सावरत , एकमेकांच्या नजरेत हरवत भिजत भिजत भटकण्याची लज्जत काही औरच…! अचानक वीज चमकते आणि ती घाबरुन अलगद त्याला बिलगते आणि तोही आपल्या स्पर्शाने तिला दिलासा देतो . किती रोमॅंटीक..! ” प्यार हुआ , इकरार हुआ ” किंवा “लगी आज सावन की फ़िर वो झडी है” सारखी गाणी नकळत ओठावर येतात . मराठीत सुद्धा ” घन घन माला नभी दाटल्या , कोसळती धारा” , “भेट तुझी माझी स्मरते” किंवा “ऋतू हिरवा” सारखी श्रवणीय गाणी आहेतच . अशा कितीतरी गाण्यांतून , कवितांमधुन पाऊस आपल्याला चिंब भिजवत आला आहे .
पण इथे भिजायला वेळ आहे कुणाला ! ऑफ़िसच्या एसीची सवय झालेल्या जीवाला थंडगार पावसाळी वारं सोसत नाही . सदानकदा इस्त्रीच्या कपड्यात वावरणारे आम्ही … आम्हाला त्यावर पावसाचे शिंतोडे उडालेले खपत नाहीत . दोन शिंका आल्या म्हणजे आम्ही डॉक्टरकडे धाव घेणार . आमच्या खिडकीच्या काचा बंद करून घेणार . ” घराने मला आज समजावले , भिजुनी घरी रोज परतायचे “ या ओळी आम्ही कधी अनुभवणारच नाही . मग पाऊस आम्हाला जीवाभावाचा वाटणारच कसा ! आणि आमच्या रूक्ष जीवनात नवी पालवी तरी कुठुन फ़ुटावी ! असंच कोरड्याने जगत राहणार की मोठेपणाची झूल बाजुला ठेवून दोन सरी झेलणार !

स्पंदनांचे नेटके घर बांधतो पाऊस हा
आतल्या ओल्या नभाशी नांदतो पाऊस हा…
दरवळे देहात कोणी रोजच्या वळणावरी
नित्य नव्या उंबर्‍याशी वाढतो पाऊस हा…
वाजते काही मनाच्या कोवळ्या काचेवरी
अन् मनाच्या पाळण्यातून रांगतो पाऊस हा…

तो आपली इनिंग सुरु करेलच आता . बघा आपल्या खिडकीची काच थोडी उघडता आली तर…

पहिल्या पावसाच्या तुम्हाला ओल्याचिंब शुभेच्छा…!

शब्द भिजलेले

शब्द भिजलेले तुझ्या अधराशी
बोल काही माझ्यासवे, थांब ना जराशी..!

खिडकीशी घुटमळे, मन सांजवारा
सळसळ पडद्याची कानी ये जराशी..!

निःशब्दाची लय वाहे जीवघेणी
ओलेती पापणी लवते डोळ्याशी..!

ओंजळीत तुझा शब्द शब्द घ्यावा
आणि निखळावा ताराही आकाशी..!

हात चांदण्याचे तुझे हाती यावे
हळुवार व्हावे स्पर्श मोरपिशी..!

त्या एका क्षणात आयुष्य सरावे
आणि जन्मा यावे पुन्हा तुझ्या देशी..!

थांब स्वप्न माझे सरू दे एवढे
सुरू होती पुढे दुनियेच्या वेशी..!

तिथे नियतीचा गुंतवेल धागा
खेळवेल दोघां जग दरवेशी..!

काय देऊ तुला, कवितेवाचून
तेच एक धन, आहे माझ्यापाशी..!

Tuesday, February 19, 2008

उमलले मी...


उमलले मी उमलले मी
मधुगंध देण्या आतुरले
चाहुल कुणा भ्रमराची
मनं माझे मोहरले


शांत झोपल्या कळीला
गुपित आज हे कळले
मधुर तरंग गात्रांत
अंग अंग बहरले


जाग पहाटेच आली
अंग चिंब चिंब ओले
ओथंबल्या आरश्यात
रूप अनोखे सजले


त्याने यावेच म्हणून
वारयासंगे झुलले
तो दिसता क्षणात
पानामागे दडले

खेळ माझ्याशी हा माझा
भान नाही उरले
लाज लाजले कितीदा
पुन्हा पुन्हा फुलले!
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचयधावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय,
रोज सकाळी खडया आवाजात राष्ट्रगीत म्हणायचय,नव्या वहीचा वास घेत पहिल्या पानावरछान अक्षरात आपलं नांव लिहायचय,मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय
मधली सुट्टी होताच वॉटरबॅग सोडूननळाखाली हात धरूनच पाणी प्यायचय,कसाबसा डबा संपवत तिखट मीठ लावलेल्याचिंचा बोरं पेरू काकडी सगळं खायचय
सायकलच्या चाकाला स्टंप धरूनखोडरबर आणि पाटीने क्रिकेट खेळायचय,उद्या पाऊस पडून शाळेला सुट्टी मिळेल काहा विचार करत रात्री झोपी जायचय,अनपेक्षित सुट्टीच्या आनंदासाठीमला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय
घंटा व्हायची वाट बघत का असेनामित्रांशी गप्पा मारत वर्गात बसायचय,घंटा होताच मित्रांचं कोंडाळं करूनसायकलची रेस लावूनच घरी पोचायचय,खेळाच्या तासाला तारेच्या कुंपणातल्यादोन तारांमधून निघून बाहेर पळायचय,ती पळून जायची मजा अनुभवायलामला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय
दिवाळीच्या सुट्टीची वाट बघतचसहामाही परिक्षेचा अभ्यास करायचायदिवसभर किल्ला बांधत मातीत लोळून पणहात न धुता फराळाच्या ताटावर बसायचयआदल्या रात्री किती ही फटाके उडविले तरीत्यातले न उडलेले फटाके शोधत फिरायचयसुट्टीनंतर सगळी मजा मित्रांना सांगायलामला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय
कितीही जड असू दे जबाबदारीच्या ओझ्यापेक्षादप्तराचंच ओझ पाठीवर वागवायचंयकितीही उकडत असू दे व़ातानुकुलित ऑफिसपेक्षापंखे नसलेल्या वर्गात खिडक्या उघडून बसायचयकितीही तुटका असू दे, ऑफिसातल्या एकटया खुर्चीपेक्षादोघांच्या बाकावर तीन मित्रांनी बसायचय,“बालपण देगा देवा” या तुकारामांच्या अभंगाचा अर्थआता थोडा कळल्यासारखं वाटायला लागलंयतो बरोबर आहे का हे सरांना विचारायलामला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचंय
Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay

Starter....

Dear Visitor,
This is Nitin Nimbalkar's personal web page.I will be posting here things which touched,moved and inspired me just for you all.

This one is of SUDHAGAD.....