Tuesday, February 26, 2008

मे महिना सरत आलेला असतो , आसमंतातला उकाडा आता शिगेला पोचलेला असतो आणि त्याची चर्चा सुरु होते . तो कुठवर आलाय ? अजुन किती दिवस लागतील ? वर्तमानपत्रात त्याच्या बातम्यांकडे डोळा लागलेला असतो . तसा कुठे कुठे तो आपली वर्दी देत असतोच . आणि एक दिवस “दक्षिण दिग्विजय” करुन जेत्याच्या थाटात तो दाखल होतो . उन्हाचे पहारे हा हा म्हणता उठतात आणि अनभिषिक्त राजाच्या दिमाखात त्याअची सद्दी सुरु होते .
मी मान्सून बद्दल बोलतोय हे एव्हाना लक्षात आलं असेलच . उन्हाच्या काहिलीने मन सुनं सुनं झाल्यावर येतो तो मान्सून . अर्थात पाऊस . निसर्गचक्राचा सृजनशील आविष्कार . सुर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याची वाफ़ होते . हलकी असल्याने ती वर वर जाते . या वाफ़ेचे ढग बनतात . हे ढग डोंगरांमुळे अडतात आणि थंडाव्यामुळे वाफ़ेचं पुन्हा पाण्यात रुपांतर होतं . हाच पाऊस असं आपण शाळेत घोकंपट्टी करत शिकलेलं असतं . पण या ऋतुचक्राला गदिमांसारखा सिद्धहस्त कवी आपल्या प्रतिभेने एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो …

नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर
कशी शहाण्यांची मनं , नाही नदीला माहेर !
काय सांगू बाप्पांनो, तुम्ह आंधळ्याचे चेले
नदी माहेरा जाते म्हणून तर जग चाले .
नदीचे सारे पाणि पोटी घेतो हा सागर
पण तिला खुणावतो जन्म दिलेला डोंगर
डोंगराच्या मायेसाठी रूप वाफ़ेचे घेऊन
नदी उडत जाते पंख वार्‍याचे लेवून
पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा
पान्हा फ़ुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा…!


अगदी पहिल्या सरीपासूनच हा पाऊस आपल्याला प्रेमात पाडतो . पहिल्या पावसानंतर येणार मृद्गंध… जणू प्रसवाला सज्ज झालेल्या धरित्रीचा हुंकार…! टपोर्‍या थेंबांना पाहून कुणा युवतीच्या पायातील पैंजणांची आठवण व्हावी …
दोन्ही आवाजात तेच माधुर्य आणि तेच अंगावर सुखद शिरशिरी आणणं …!

पण शहरवासीयांसाठी पाऊस महत्त्वाचा असतो फ़क्त धरणातल्या पाणीसाठ्यासाठी किंवा एखाद्या वर्षा सहलीपुरता . तसा वागला की मग तो अगदी आज्ञाधारक ठरतो . पण त्याने जरासा खट्याळपणा सुरु केला की मग तारांबळ उडवून देतो . मग हीच मंडळी पावसाच्या नावाने बोटं मोडायला सुरुवात करतात . अशाच दोन विचारातला वाद कवी सौमित्र यांनी भांडणार्‍या प्रेमी युगुलाच्या निमित्तानं छानच टिपलाय…

पाऊस म्हणजे चिखल सारा , पाऊस म्हणजे मरगळ..
पाऊस म्हणजे गार वारा , पाऊस म्हणजे हिरवळ..

पाऊस कपडे खराब करतो , पाऊस वैतागवाडी..
पाऊस म्हणजे भिजरी पायवाट , पाऊस म्हणजे झाडी..

पाऊस रेंगाळलेली कामं , पाऊस म्हणजे सुट्टी उगाच..
पावसामध्ये गुपचुप निसटून मन जाऊन बसतं ढगात …
प्रेमी युगुलांसाठी पाऊस म्हणजे पर्वणीच . एकाच छत्रीतून एकमेकांना सावरत , एकमेकांच्या नजरेत हरवत भिजत भिजत भटकण्याची लज्जत काही औरच…! अचानक वीज चमकते आणि ती घाबरुन अलगद त्याला बिलगते आणि तोही आपल्या स्पर्शाने तिला दिलासा देतो . किती रोमॅंटीक..! ” प्यार हुआ , इकरार हुआ ” किंवा “लगी आज सावन की फ़िर वो झडी है” सारखी गाणी नकळत ओठावर येतात . मराठीत सुद्धा ” घन घन माला नभी दाटल्या , कोसळती धारा” , “भेट तुझी माझी स्मरते” किंवा “ऋतू हिरवा” सारखी श्रवणीय गाणी आहेतच . अशा कितीतरी गाण्यांतून , कवितांमधुन पाऊस आपल्याला चिंब भिजवत आला आहे .
पण इथे भिजायला वेळ आहे कुणाला ! ऑफ़िसच्या एसीची सवय झालेल्या जीवाला थंडगार पावसाळी वारं सोसत नाही . सदानकदा इस्त्रीच्या कपड्यात वावरणारे आम्ही … आम्हाला त्यावर पावसाचे शिंतोडे उडालेले खपत नाहीत . दोन शिंका आल्या म्हणजे आम्ही डॉक्टरकडे धाव घेणार . आमच्या खिडकीच्या काचा बंद करून घेणार . ” घराने मला आज समजावले , भिजुनी घरी रोज परतायचे “ या ओळी आम्ही कधी अनुभवणारच नाही . मग पाऊस आम्हाला जीवाभावाचा वाटणारच कसा ! आणि आमच्या रूक्ष जीवनात नवी पालवी तरी कुठुन फ़ुटावी ! असंच कोरड्याने जगत राहणार की मोठेपणाची झूल बाजुला ठेवून दोन सरी झेलणार !

स्पंदनांचे नेटके घर बांधतो पाऊस हा
आतल्या ओल्या नभाशी नांदतो पाऊस हा…
दरवळे देहात कोणी रोजच्या वळणावरी
नित्य नव्या उंबर्‍याशी वाढतो पाऊस हा…
वाजते काही मनाच्या कोवळ्या काचेवरी
अन् मनाच्या पाळण्यातून रांगतो पाऊस हा…

तो आपली इनिंग सुरु करेलच आता . बघा आपल्या खिडकीची काच थोडी उघडता आली तर…

पहिल्या पावसाच्या तुम्हाला ओल्याचिंब शुभेच्छा…!

No comments: